काय बोलता! जगातील एकमेव गणपतीचे मंदिर जेथे एकाच व्यासपीठावर दोन स्वयंभू गणपती बाप्पा आहेत विराजमान  (The only Ganapati temple in the world having two self-made Ganesha idols on the same platform)

कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या स्मरणाने व पूजनाने होते. सर्व मंगल कार्यात श्री गणेश म्हजेच आपले सर्वांचे लाडके गणपती ह्यांना आद्य पूजनाचा मान प्राप्त आहे.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ: |

निर्विघ्नं कुरुमेदेव सर्व कार्येशु सर्वदा ||

अर्थात, ………

आपल्या लाडक्या श्री गणेश देवाला भक्तगण आप-आपल्या आवडी नुसार वेगवेगळ्या नावाने बोलवितात. बालक गणेशाला बाप्पा किंवा गणपती म्हणतात, तर इतर काही प्रचलित नावे ज्यात, गजानन, गणराया,लंबोदर, विनायक व अशी खूप सारी वेगवेगळी नावे आहेत.

अशा या श्री गणेशाच्या भारतभर व जगातील इतर देशात सुद्धा खूप सारी मंदिरे आहेत. सर्व गणेश भक्त वर्षभर व खास करून चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत असतात व श्री गणेशचे आशीर्वाद प्राप्त करत असतात.

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत सर्वांचे लाडके असे श्री गणेश ह्यांचा मोठा उत्सव साजरा होत असतो. सदर काळात भगवान श्री गणपती हे आपल्या भक्तांच्या घरी येत असतात. गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने सर्व अबाल व वृद्ध एकत्र येऊन साजरा करत असतात. सदर काळात घरोघरी सोबतच श्री गणपती ह्यांची सार्वजनिक रुपात म्हणजेच गणपती मंडळात सुद्धा गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने व धूम धडाक्यात साजरा केला जातो. गणपती उत्सवचे दिवस बालकांना व युवकांना तर दिवाळी सण पेक्षाही मोठा वाटतो.

सर्वांच्या घरी, सार्वजनिक मंडळात व मंदिरात सर्वठिकाणी भगवान श्रीगणपती ह्यांची एक मूर्ती सिंहासनावर आसनस्थ असते. ह्यात मुख्यत्वे डावे सोन्डीचे (Left-trunk Ganesha) किंवा उजव्या सोन्डीचे (Right-trunk Ganesha) श्री गणेशाच्यामुर्ती विराजमान असतात.

दोन स्वयंभू गणपती बाप्पा एकाच मंदिरात एकाच व्यासपीठावर

आज आपण जाणून घेणार आहोत श्रीगणेशाच्या एक अश्या मंदिरा बाबत ज्यात एकाच वेळी एकाच सिंहासनावर श्रीगणेशच्या दोन मूर्ती  म्हणजेच डावे सोन्डीचे आणि उजव्या सोन्डीचे श्री गणेश विराजमान आहेत. असे हे जगातील एकमेव असे श्रीगणेशाचे अलौकिक असे मंदिर आहे जेथे डावे सोन्डीचे आणि उजव्या सोन्डीचे श्रीगणेश स्वयंभू अश्या मूर्ती आहेत. म्हणजे या मूर्ती कोणी बनवून किंवा घडविलेल्या नाहीत. हे स्थान म्हणजे जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र पद्मालय आहे.

पद्मालय हे तीर्थक्षेत्र निसर्गरम्य अश्या उंच डोंगरांमध्ये कमळाच्या फुलांनी सजलेल्या सुंदर अश्या तलावाच्या काठी आहे. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या तलावात लाल, गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या व जांभळ्या रंगाची मनमोहक कमळाची फुले उमलत असतात. कमळाच्या फुलाला पौराणिक भाषेत ‘पद्म’ असेही म्हणतात व तलावास ‘आलय’ असे संबोधले जाते. पद्म व आलय ह्यांचा मेळ होऊन ‘पद्मालय’ असे नाव ह्या तीर्थ क्षेत्राला मिळाले असावे अशी आख्यायिका ह्या भागात सांगितली जाते.

Padmalaya Temple

संपूर्ण जगात श्री क्षेत्र पद्मालय एकमेव असे ठिकाण आहे जेथे दोन स्वयंभू गणपती दोन्ही रूपाने प्रवाळ स्वरुपात प्रकट झालेले असून एकाच सिंहासनावर दोन्ही गणपती विराजमान झालेले आहेत.

श्री क्षेत्र पद्मालय म्हणजे आसपास उंचउंच टेकड्या व डोंगर, घनदाट झाडी व दऱ्या खोऱ्या, डोंगराच्या पायथायाशी वाहणारी गिरणा नदी व डोंगराच्या वर मधोमध कमळ फुलांनी भरलेला तलावाकाठी भव्य गणपती मंदिर असे नयनरम्य व मनमोहक ठिकाण भाविकांना वेगळीच आध्यामिक अनुभूती मिळत असते.

पुराणात आढळतो ह्या मंदिराचा उल्लेख

श्री क्षेत्र पद्मालय चा उल्लेख गणेश पुराणातील उपासना खंड अध्याय क्रमांक ७३, ७४ व ९० मध्ये आढळतो.

डाव्या सोंडेचे गणपती –

देव व दानव मिळून समुद्र मंथन केल्याची कथा आपणा सर्वांनाच सर्वश्रुत आहे. समुद्र मंथन वेळी वासुकी सर्पचा वापर दोरी म्हणून करण्याचे ठरविले गेले. परंतु वासुकी सर्पच्या मुखातून निघणारी विषयुक्त अग्नी व दर्प याचा होणारा त्रास दानव म्हणजेच राक्षस सहन करू शकले नाहीत. समुद्र मंथनातून निघणारा प्रथम रत्न दानवांना मिळेल या अटीवर समुद्र मंथन परत सुरु झाले व प्रथम रत्न स्वरुपात मिळाले ते म्हणजे महा भयंकर असे ‘हलाहल’ विष. हलाहल विष म्हणजे साक्षात मृत्यू म्हणून दानवांनी आणि देवांनीही हे रत्न स्वीकारण्यास नकार दिला. पण हे विष इतर प्राणी मात्रा साठी जीव घेणे ठरत होते.

जगत कल्यानासाठी साक्षात भगवान महादेवानी हलाहल विष प्राशन केले.विषाचा प्रकोप म्हणून महादेव यांचा कंठ निळा पडला व तेव्हा पासून महादेवाना ‘नीलकंठ’ संबोधले जाऊ लागले. परंतु हलाहल विषचा असर मुळे महादेवयांच्या अगाची आग होऊ लागली व गळ्यात लाही लाही होऊ लागली. शेवटी भगवान महादेवांनी आपल्या गळया भोवती शेषनागाला गुंडाळले ज्यामुळे गळ्यात होणारी आग पासून महादेवाना आराम मिळाला.

परंतु या गोष्टीचा शेषनागला गर्व झाला शेषनाग स्वताला फार मोठा समजू लागला व इतर शिवगण व देवतांना कमी लेखू लागला. शेषनागाचे गर्व हरण करण्यसाठी महादेवांनी त्याला पृथ्विवर फेकून दिले. त्यामुळे शेषनागाला पश्चाताप होऊ लागला, मग महर्षी नारद यांच्या सांगण्या वरून शेषनागाने श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी ‘नमो हेरंब’ या मंत्रोच्चारचा वापर करत पद्मालय येथे तप केला.

शेषनागाच्या तपावर प्रसन्ना होऊन श्री गणपती यांनी प्रवाळ रत्न स्वरुपात प्रकट होऊन शेषनागाला दर्शन दिले. व नंतर शेषनागाच्या विनंती नुसार पद्मालय येथेच प्रवाळ स्वरुपात ‘डाव्या सोंडेचे’ गणपती म्हणून विराजमान झाले. तेव्हा पासून आज पर्यंत श्री गणपती आपल्या भक्ताच्या मनोकामना पूर्ण करत असतात.

उजव्या सोंडेचे गणपती –

भगवान विष्णूच्या परशुराम अवताराच्या काळात कृतीवीर्य नावाचा एक पराक्रमी राजा होता. राजा पराक्रमी, न्यायप्रिय व आपल्या जनते वर आपल्या मुलासारखे प्रेम करायचा. परंतु राजा वृद्ध झाला तरी त्याला स्वताचे आपत्य नव्हते म्हणून राजा व त्याची राणी दुखी राहत असे. एकदा राजा कडे श्री गुरुदत्त भगवान आले, राजाने श्री गुरुदत्त भगवान यांची मनाने सेवा केली. श्री गुरुदत्त भगवान यांनी राजाला दुखी असल्याचे कारण विचारल्यावर राजाने आपले दुख सांगितले. तेव्हा श्री गुरुदत्त भगवान यांनी पुत्रप्राप्ती साठी चतुर्थी व्रताचे अनुष्ठान करावयास सांगितले. कृतीवीर्य राजाने मनोभावे चतुर्थी व्रताचे अनुष्ठान केले, झाले! राणी गरोदार राहिली. श्री गुरुदत्त भगवान व गणपतीच्या आशीर्वादाने राजाला पुत्ररत्न प्राप्त झाला. बाळाचा चेहरा अत्यंत सुंदर व देखणा होता परंतु बाळाच्या शरीराला हात व पाय नव्हते. त्यामुळे राजा व राणी अत्यंत दुखी झाले. त्यांनी बाळाचे नाव ‘कार्तवीर्य’ ठेवले.

श्री गुरुदत्त भगवान परत भ्रमण करत असताना राजा कडे आले तेव्हा राजाने त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि बाळास त्यांच्या सामोरे ठेवण्यात आले. राजा रडू लागला व शोक करताना श्री गुरुदत्त भगवान यांना विचारू लागला की माझ्या हातून काही अनिष्ट किंवा पाप घडले असेल म्हणून मला असा पुत्र प्राप्त झाला. त्यावर श्री गुरुदत्त भगवान म्हणाले राजन तुम्ही चतुर्थी व्रताचे अनुष्ठान करत असताना तुम्हाला जांभई आली व तू त्यावेळेस ‘आचमन’ न करता तसेच आपले अनुष्ठान चालू ठेवले, म्हणून असे मुल जन्माला आले. ह्या बाळाचा तू त्याग करू नकोस, ह्याला तीर्थयात्रेला पाठव व श्री गणेश यांची उपासना करायला सांग. राजाने आपल्या मुलाला आपल्या काही खास विश्वस्त सैनिक बरोबर तीर्थयात्रेला पाठवून दिले.

तीर्थ यात्रा करत असताना ‘कार्तवीर्य’ पद्मालय या ठिकाणी आला व येथेच श्री गणेश यांची उपासना करावयाचे ठरविले. येथेच उपासना करत असताना ‘ऑम गं’ या एक अक्षरी बीज मंत्राचा जाप सुरु केला. कार्तवीर्य याची उपासनावर श्री गणेश प्रसन्ना झाले व उजव्या सोंडेचे स्वरुपात प्रवाळरूप धारण करत श्री गणेश कार्तवीर्य समोर प्रकट झाले आणि त्याला दर्शन दिले. कार्तवीर्य ला बहु आनंद झाला व दुखही झाले, तो देवास म्हणाला हे प्रभू, मला क्षमा करा! आपण मला दर्शन द्यायला आलात पण मी आपल्या समोर उभा राहून, दोन्ही हात जोडून मला आल्याला नमस्कार करता येत नाही. माझा वर अनुग्रह करा. त्याच्या तपश्चर्या व विनाम्रतेवर प्रसन्न होऊन श्री गणेश भगवान यांनी कार्तवीर्यला दोन पाय व सहस्त्र बाहू दिले. पुठे हाच कार्तवीर्य सहस्त्र हातांचा ‘सहस्त्रार्जुन’ म्हणून अत्यंत शूर व पराक्रमी राजा प्रसिद्धीस आला.

कार्तवीर्यच्या तपश्चर्यवर प्रसन्न होऊन उजव्या सोंडेचे स्वरुपात प्रवाळरूप धारण करत श्री गणेश श्री क्षेत्र पद्मालय येथे प्रकट झाले व तेव्हा पासून ते त्याच रुपात आपल्या भक्तांना दर्शन देत आहेत व त्यांच्या मनोकामना पूर्ण करत आहेत.

ह्या दोन्ही घटने मुळे श्री गणेश भगवान स्वयंभू स्वरुपात श्री क्षेत्र पद्मालय येथे डाव्या व उजव्या सोंडेच्या स्वरुपात प्रकट झाले आहेत.

हे पण वाचा : महाराष्ट्रातील एक असा किल्ला जिथे आठळते सात रंगी माती

श्री क्षेत्र पद्मालय येथे कसे पोहोचाल (How to reach)
१.  रेल्वे मार्ग –

श्री क्षेत्र पद्मालय येथे पोहोचण्या साठी सर्वात जवळचे मोठे रेल्वे स्थानक जळगाव जं. आहे जे जवळपास ४० कि.मी. दूर आहे, तसेच जळगाव मुंबई रेल्वे लाईन वर म्हसावद व पाचोरा रेल्वे स्थानक ही श्री क्षेत्र पद्मालय पासून जवळ आहेत. तसेच जळगाव सुरत रेल्वे लाईन वरील धरणगाव रेल्वे स्थानक श्री क्षेत्र पद्मालय पासून जवळपास १५ कि.मी. अंतरावर आहे.

२. रस्ते मार्ग –

रस्ते मार्गाने यायचे झाल्यास श्री क्षेत्र पद्मालय पासून मुख्य महामार्गावर वसलेले एरंडोल हे शहर ७ ते ८ कि.मी. अंतरावर आहे. तसेच जळगाव येथून ४० कि.मी. अंतरआहे.

३. हवाई मार्ग –

जळगाव हे येथून सर्वात जवळचे विमानतळ असून जळगाव येथून मुंबई, पुणे, गोवा व अमदावाद साठी विमान सेवा उपलब्ध असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top